marathi blog vishva

मंगळवार, २७ जुलै, २०१०

निर्भीड व्हा--१५

अमेरिकेची लोकशाहीची काळजी-५

अमेरिकेचे व्हियेतनाम युद्ध संपवण्यात "पेंटॅगॉन पेपर्स" नावाच्या कागदपत्रांचा जसा वाटा होता, तसाच वाटा सध्याचे इराक युद्ध संपवण्यात "इराक पेपर्स" ह्या पुस्तकातील कागदपत्रांचा व्हावा, हे वाचकाला प्रकर्षाने पटण्यासारखे आहे. अमेरिकेच्या लोकशाहीची हीच कदाचित ताकत व ओळख आहे असे म्हणता येईल. कारभार खूपच कार्यक्षमतेने व्हावा म्हणून राज्य चालवणार्‍या प्रमुखाला ( अध्यक्षाला ) अमर्याद अधिकार द्यायचे व पत्रकारितेने व जनतेने चर्चेतून, कागदोपत्री पारदर्षकता जपत, त्याला वेसण घालायची असा ह्यांच्या लोकशाहीचा एकूणच घाट दिसतो. ह्यालाच जागून सध्या विकीलीक्स नावाच्या संकेतस्थळावरून इराक-अफगाण युद्धाची हजारो कागदपत्रे वर्तमानपत्रातून प्रसृत होत आहेत. ह्याचा चांगला परिणाम जागतिक राजकारणात लवकरच दिसेल असे वाटते.

व्यक्तिस्वातंत्र्याची व भाषणस्वातंत्र्याची परिसीमा वाटावी असे अजून एक पुस्तक इथली पोरं-सोरंही वाचताना दिसतात, ते आहे जॉन स्टयुअर्ट ह्या "डेली शो" करणार्‍या विनोदवीराचे, "अमेरिका द बुक" . विनोदाबरोबरच ह्यात टारगटपणा इतका आहे की सुप्रीम कोर्टातल्या न्यायाधीशांचे ( ह्यात एक बाईही आहे ), नागडे फोटो दिले आहेत. असल्या वस्त्र-हरणाचा इतर कुठल्याही लोकशाहीत थेट गळाच घोटल्या गेला असता. पण इथे अगदी शालेय पुस्तकासारखे हे पुस्तक वाचल्या जाते, मजा करीत !

ह्याच जोडीला इथल्या लोकशाहीला आधार आहे तो मुक्त अर्थव्यवस्थेतल्या "पैसे कमावण्याचा" व त्याबद्दल बिलकुल काही न वाटण्याचा ! ह्या पुस्तकात इतकी सहजपणे माहीती येते की व्हाइस प्रेसिडेंट डिक चेनी हे कसे एका बलाढ्य तेल कंपनीचे ( हॅली बर्टन ) चेअरमन होते व इराक युद्धात अमेरिकन तेल कंपन्यांनी तेलाचे परवाने कसे हातोहात ढापले होते. ज्या वीकीलीक्स संकेतस्थळाने सध्याची युद्धाची रहस्ये उघडी केली आहेत,त्यांनी किती व कसे पैसे केलेत हेही पेपरात येते. ज्या बॅंका डुबल्या त्यांच्या अधिकार्‍यांनी बोनस म्हणून किती प्रचंड पैसे केले, ज्या आर्थिक मुक्त व्यवस्थेच्या दावेदार खाजगी कंपन्या आहेत त्या वेळोवेळी सर्व नीती-नियम धाब्यावर बसवून कसे पैसे लुटतात हे सर्व अमेरिकन लोकांना माहीत असते, फक्त त्यांना त्याचे सोयर-सुतक नसते ! प्रचंड पैशाची अजिबात लाज वाटू नये अशी ही अमेरिकन लोकशाही !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

३ टिप्पण्या:

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. निर्भिड व्हा असे नुसते सांगू नका. भारताचे पंतप्रधान हतबुद्ध असतात असे मी म्हणतोय. तुम्ही काय म्हणता जरा सांगा. कुणीच काही म्हणायला तयार नाही.
    http://www.yekulkarni.blogspot.com

    उत्तर द्याहटवा
  3. आपण जेव्हा भारतीय पंतप्रधान हतबुद्ध आहेत असे म्हणता तेव्हाच निर्भीड होण्याचा अध्य़ाय सुरू होतो. शेवटी हा प्रत्येकानेच करायचा अश्वमेध आहे. आपापले घोडे दामटण्याने ही यात्रा सफल होणार आहे. फार फार तर कोण कुठे व कसे दडून बसले आहेत हे एकमेका खुणावू शकतो.

    arunbhalerao67@gmail.com

    उत्तर द्याहटवा