marathi blog vishva

सोमवार, २६ जुलै, २०१०

निर्भीड व्हा--१४
अमेरिकेची लोकशाहीची काळजी-४
माणसाचा पूर्वेतिहास जसा त्याच्या वर्तमानाचा व भविष्याचा लेखाजोखा सांगतो तसेच एखाद्या देशाचे वागणे त्याच्या इतिहासाला धरून असते असे "इराक पेपर्स" ह्या पुस्तकाच्या लेखकांना वाटते. निदान त्यामुळे आत्ताचे वागणे कळायला मदत होते. हे तसे रास्तच आहे, हे आपण डॉक्टर मंडळी रोगाचा इतिहास हमखास आधी विचारतात त्यावरून ताडू शकतो. अमेरिकेचा इतिहासही असाच रंजक असून त्यांचे सध्याचे वागणे,त्यांचे लोकशाहीचे प्रेम व प्रयत्न हे रहस्य उकलणारे आहे.

अमेरिकेचे सुबत्तेत, राजकारणात, ज्ञानात, अव्वल स्थान आहे हे तर वादातीतच. तसेच त्यांचे जागतिक स्तरावर कायम प्रभाव पाडण्याचे ध्येय असते हेही सर्वश्रुतच आहे. अर्थकारणात, लोकशाहीच्या कारभारात, मुक्त अर्थव्यवस्थेत, त्यांना ज्या देशांचा अडथळा येतो त्यांची ते अजिबात गय करीत नाहीत, असाच इतिहास आहे. त्यांच्या अंतर्गत लोकशाही साठी व आर्थिक सुबत्तेसाठी,वस्तु व कच्च्या मालाच्या अनिर्बंध पुरवठ्यासाठी, त्यांना बाहेरच्या देशातल्या सत्ता आपल्याप्रमाणे वळत्या करून घेण्याचा वा प्रसंगी उलथून टाकण्याचा नादच आहे. १९५४ मध्ये ग्वाटेमाला मध्ये अमेरिकेने आक्रमण करून तिथली साम्यवादी राजवट उलथून टाकली,ती "युनायटेड फ्रुट कंपनी ऑफ बोस्टन" ह्यांच्या फायद्यासाठी. कारण त्या काळी ग्वाटेमाला मध्ये २ टक्के जमीन-मालक ७० टक्के फळबागा बाळगून होते व तिथल्या सरकारात एकूण ५८ सभासदांपैकी ४ सभासद साम्यवादी होते. "इराक पेपर्स" ह्या पुस्तकात ही माहीती वाचत असताना केवळ तेलासाठी, अमेरिकेने इराकवर चढाई केली असे म्हणणार्‍यांचा युक्तिवाद सहजी पटण्यासारखा होतो. १९५३ मध्ये सी.आय.ए.च्या मदतीने ईराणच्या मोहमद मोसाद ह्यांच्या विरुद्ध उठाव करून शाह रझा पेहलवी ह्यांना बसवणे व तेलाची वाटणी करून घेणे, हे आता खूपच ओळखीचे वाटू लागते.असेच प्रकार अमेरिकेने पोर्टो-रिको,फिलिपीन्स,ग्वाम व क्युबा असेही हे पुस्तक सांगते. इतिहासातली कांगो, इंडोनेशिया, चिली, हैती, डॉमिनिकन रिपब्लिक, हवाई, ही प्रकरणेही अशाच प्रकारांसाठी बदनाम आहेत.ज्या रशिया कडून २ सेंट दर एकरी भावाने अलास्का हा मोठ्ठा भूभाग विकत घेतला त्या रशियाचा आंतरराष्ट्रीय पाडाव झाल्यानंतर तर अमेरिका ही एक सुपर-सत्ता झाली आहे, हे तर सर्वमान्यच आहे. आणि म्हणूनच ही सुपर-सत्ता लोकशाही मूल्ये राखणारी होणे अति महत्वाचे ठरते.

ही प्रकरणे जरी सर्वश्रुत असली तरी त्यानंतर प्रत्येक प्रसंगानंतर लोकांनी व नंतरच्या अध्यक्षांनी ह्या सर्व घटनांचा नुसताच निषेध नव्हे तर असे पुन्हा होणार नाही व अमेरिका लोकशाही परंपरा बाळगेल अशी खबरदारी घेतलेली आहे ही माहीती ह्या पुस्तकाचे लेखक आवर्जून सांगतात. आणि आपण ती ओबामा ह्यांच्या विजयाने ती आता प्रत्यक्ष पहातच आहोत. आणि केवळ ह्याच हेतूसाठी इराकच्या युद्धात सरकारने किती व कशा चुका केल्या हे सप्रमाण हे पुस्तक दाखवून देते. ह्याच लोकशाहीच्या काळजी पोटी मग पुस्तकाचे मोल चांगलेच वाढते.

ही सर्व पुस्तकातली माहीती किती ताजी आहे हे आजच्याच बातमीने पडताळता येते. विकीलीक्स नावाच्या संकेत-स्थळावर इराक युद्धाची हजारो कागद पत्रे प्रसिद्ध झाली असून आता लोकांना ह्या युद्धामागची रहस्ये खुली होत आहेत अशा अर्थाची बातमी आजच्याच ( २६ जुलै’१०) वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये वाचायला मिळेल.

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा