निर्भीड व्हा --११
अमेरिकेची लोकशाहीची काळजी
लोकशाहीच्या परंपरा खोल व दीर्घ काल रुजाव्या लागतात हेच खरे. ज्या लोकशाहीच्या नावाने एक अमेरिकेचा अध्यक्ष ( जॉर्ज बुश-२) इराकवर सर्व जगाला धाब्यावर बसवून चक्क लढाई करतो, त्यात हजारो लोकांचे प्राण जातात त्याच अमेरिकेत लोकशाही परंपरेचे लोकांना इतके भान असते की लोकलज्जेचे निर्भीडपणे वाभाडे तिथले लोक सहजी काढतात.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस तर्फे नुकतेच प्रकाशित झालेले "इराक पेपर्स" नावाचे पुस्तक वाचून ही खात्री होते. जॉन एरेनबर्ग व इतर तीन प्राध्यापकांनी लिहिलेले हे पुस्तक मार्च २०१० साली प्रसिद्ध झाले. ह्यात सरकारने जी कागदपत्रे २००५-६ साली जनतेसाठी खुली केली आहेत त्याच्या आधारे इराक युद्धाचा इतिहास व त्यावरची टिप्पणी केली आहे. मुळात गुप्त कागदपत्रे जनतेसाठी खुली करणे हीच फार मोठी लोकशाही व निर्मळ परंपरा आहे. आपल्या कडची सरकारे असे कदापी करणार नाहीत. कारण त्यासाठी जनतेला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य बाळगावे लागेल. अमेरिकेला कितीही नावे ठेवली तरी खुलेपणाबद्दल त्यांचा हात धरणारा अजून तरी इतर देश जगावर नाही. सामाजिक जीवनात तसेच राजकीय व्यवहारात. ज्या सहजतेने चौथीतला आमचा नातू सांगू शकतो की त्याची टीचर लेस्बीयन आहे त्याच सहजतेने तो वांशिक भेदाभेद केला म्हणून हेड मास्तरांशी भांडतो. अशा देशात प्राध्यापक मंडळींनी राजकीय क्षेत्रात पारदर्शी चित्र रेखाटावे हे साहजिकच आहे. नोम चोम्स्की ह्यांची निर्भीड अमेरिका-विरोधी भाषणे इंटरनेटवर म्हणूनच मुबलकपणे उपलब्ध असतात. त्याच परंपरेतले हे पुस्तक आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षाला अमर्याद अधिकार घटनेनेच असतात. एखादा कायद्याचा तो जेव्हा फतवा काढतो तेव्हा खुद्द त्यानेच तो मोडलेले प्रसंग त्याला कायद्याने माफ होतात. ह्याला ते "सायनिंग स्टेटमेंट्स" म्हणतात. म्हणजे नोकरीच्या आधी एखाद्याला, किंवा नटाला सिनेमाचा करार करतानाच जशी "सायनिंग अॅमाऊंट" देतात तशीच ही कायदा मोडण्याची अध्यक्षाला दिलेली माफी असते. फक्त ती त्याला जाहीर करावी लागते. अमेरिकेच्या ४२ अध्यक्षांनी मिळून बुश ह्यांच्या आधी असे एकूण ३२२ "सायनिंग स्टेटमेंटस" दिलेली आहेत असे ह्या पुस्तकातून कळते. ह्या उलट एकट्या जॉर्ज बुश (२) ह्यांनी पहिल्या सहामाहीतच ४२२ व एकूण ७५० कायदेभंगांना कायदेमाफी ह्या अधिकाराद्वारे मिळवलेली आहे. अमर्याद अधिकार असलेला अमेरिकेचा अध्यक्ष किती थराला जाऊ शकतो हे जसे ह्या टीकेद्वारे कळते तसेच आपण केलेल्या कायदेभंगाला कायद्याने माफी मिळवावी लागते ही अमेरिकेची लोकशाही परंपराही चटकन कळते व ह्या पारदर्शी पणाने ऊर भरून येतो.
ही वानगी दाखल एकच गोष्ट. अशा अनेक गोष्टी राजकारणाच्या विद्यार्थ्याला ह्या ६२० पानी पुस्तकात संदर्भासह सापडतात.
अमेरिकेची ही लोकशाहीची काळजी धन्य करणारी नक्कीच आहे.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर याला लोकशाही म्हणत नाहीत.
उत्तर द्याहटवाएखाद्या लोकशाही असलेल्या देशाच्या अध्यक्षाला बेजबाबदारपणे वागता येणे हे लोकशाहीचे लक्षण नव्हे. उलट अमेरिकेसारख्या देशाच्या अध्यक्षाने अतिशय जबाबदारीने वागणे जरूरी आहे. अर्थात तेथील लोक अध्यक्षाविरूद्ध उघडपणे बोलतात व त्याची टरही उडवतात हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण आहे. हे आपणही करू शकतो पण आपल्या इथे व्यक्तिपूजा जास्त आहे त्यामुळे अशी टीका कमी प्रमाणात होते.
उत्तर द्याहटवाअमेरिकी लोकांमध्ये Acceptance नक्कीच असतो, तीच गोष्ट आपणास लागू झाल्यास व फारसे फाटे न फोडल्यास नक्कीच त्यांचा पारदर्शीपणा चे कौतुक करावे लागेल आणि घटनेचा फायदा अमेरिकी अध्यक्षच काय पण कोणताही राजकारणी करतोच कि, त्यात काय वावग. अगदी तशीच (अमेरिकी अध्याक्षांसारखी) नसली तरी असे म्हणतातच कि फायर ब्रिगेड वाल्यांना सुधा आपल्या कडे अशी "सुविधा" आहे. शंभर खून माफ. खर कोणाला माहित. असो.
उत्तर द्याहटवा