निर्भीड-६
भोपाळचा सुरमा
पूर्वी ठिकठीकाणी सुरमा नावाचे एक काजळ विकल्या जाई. हे घातल्याने दृष्टी सुधारते असे हे वैदू लोक सुरमा काही लोकांना फुकट घालून त्यांच्याकडून वदवून घेत. भोपाळचा सुरमा फार प्रसिद्ध असे. शोलेत नाही का कव्वाल सूरमा भोपाळी ! तर अजूनही भोपाळ हे सुरम्या साठीच प्रसिद्ध आहे हे सरकार दाखवून देत आहे. शिवाय ह्या भोपाळ सुरम्यावरून "सरकार" हे प्रकरण लोकांना अगदी स्वच्छ दिसू लागले आहे.
"सरकारे" नेहमी अशीच का वागत असतील बरे ? रस्त्यावर एखाद्या सायकल वाल्याशी मोटारीची टक्कर झाली असेल तर पोलीस काय करतो ? तर सायकल वाल्याला जनरल दम मारून पळवून लावतो व मग मोटारवाल्याला लायसन दाखव, सिग्नल का पाहिला नाहीस , लायसन्स वरून माणसाचे नाव, ऐपत वगैरेचा अदमास घेत हजार रुपये दंड भरायला लागेल, दारू पिऊन चालवीत होतात का त्याची टेस्ट करावी लागेल असे घाबरवून टाकणारे निर्णय तो सांगू लागतो. आणि आपल्याला तसेच मोटारवाल्याला माहीत असते की काही तरी "घेऊन" तो हे मिटवतो.
भोपाळचे वायुकांड झाले त्यानंतर एक विमान भरून अमेरिकेतले वकील भोपाळला आले होते. ते म्हणत होते आम्हाला वकील नेमा, आम्ही ह्यांच्याकडून भरपूर पैसे वसूल करू व त्यातूनच फी घेऊ. सरकारला नक्कीच ह्यात काही मिळणारे नव्हते, मग ते कशाला असे होऊ देतील. आणि झालेही तसेच. २६ वर्ष केस चालली. सगळे जण जुजबी शिक्षेवर सुटले.
आता रस्त्यावरचा पोलीस वागला असता तसेच सरकार वागले ना ? मग आपल्याला ह्याचे वाईट का वाटते ? कारण आपण अजूनही भोपाळचा सुरमा वापरलेला नाही व त्यामुळे आपल्याला अजूनही हे स्वच्छ दिसत नाही आहे.
सुरमा लो , सुरमा लो, भोपाळका !
अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
भ्रमण: ९३२४६८२७९२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा