marathi blog vishva

रविवार, २३ जानेवारी, २०११

प्रजासत्ताकाची लपालपी !
आपल्याला लहानपणचे खेळ इतके आवडतात की आपण मोठे झाल्यावरही तेच खेळत राहतो . असाच एक खेळ आहे, लपालपीचा "प्रजासत्ताकाची लपालपी !"
ह्यात लपण्याची पाळी असते प्रजेची. त्यांना शोधण्याचे ( जसे चोर-पोलीसमधले पोलीसाचे राज्य ) काम कोणालाच नको असते. मग सगळेच लपणारे ! आपण मुळी शहरात राहतो तेच लपण्यासाठी. म्हणजे पहा हं, एखाद्याला गुन्हा करून पसार होताना कुठे लपायचे असेल तर तो कुठे लपेल ? गावी गेला तर ईन-मीन एवढीसी घरं. बरं त्यात हा कोण नवीन आलाय, असं पटकन नाही का ओळखल्या जायचा ? त्यामुळेच तो लपतो, शहरात. मुंबई बेस्ट. इथे अगदी आरामात लपता येतं. कोण कोणाला ओळखत नाही. ए-विंग मधला बी-विंगवाल्याला, एक नंबरातला दोन नंबरला, गोरा काळ्याला असे कोणीच कोणाला ओळखत नाही. म्हणूनच तर कसे सगळे, चोर-लफंगे-साधू-बिधू , गुण्या गोविंदाने राहू शकतात.
अशीच सोय आहे प्रजासत्ताकाच्या लपालपीची ! आता प्रजा कुठे लपते ते पहा हां ! मागच्या निवडणुकीत सगळ्यात अधिक जागा मिळवून निवडून कोण आलं ? सोनिया गांधी. आता तिची सत्ता. पण ती स्वत: लपली कुठे ? तर मनमोहनसिंहाच्या पगडी मागे. खरे राज्य तर हिचेच आहे, पण करतेय कोण ? तर पंतप्रधान मनमोहन सिंह ! बरं, निवडणुकीत म्हणे प्रजेतल्या एकाला निवडून यावे लागते . तसे ते निवडून आले आहेत का ? आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री, चौहान हे तरी निवडून आलेले आहेत का? नाही, पण येतील यथावकाश !
कंपनीचे मालक हे तर खरे म्हणजे कंपनीचे सर्वेसर्वा ! पण ते कुठे लपतात ? तर चीफ एक्झीक्युटीव्ह च्या मागे. का ? उगीच कशाला आपण रोषाचे धनी व्हा ? मुख्य अधिकारी बरा की. शिवाय ते मिळतातही पैशाला पासरी ! घरचा कर्ता कोण ? तर पुरुष , बाबा. ते कुठे लपतात ? आईच्या मागे. "अगं तू ते रेशन-कार्ड घेऊन ये बरं का, कुटुंब प्रमुख म्हणून माझ्याजागी फॉर ची सही कर म्हणजे झालं !"
शिक्षक कुठे लपतात ? विद्यार्थ्यांच्या मागे . "अहो अभ्यासच करत नाहीत, शाळेचा रिझल्ट चांगला कसा लागणार ?"
प्रजासत्ताकात म्हणे प्रजेचे, प्रजेसाठी, प्रजेकडून राज्य चालते. मतेच मुळी कोणाची ते कळत नाही. अल्पसंख्यांकांना सवलती दिल्या, त्यांचे लांगुलचालन केले की ते एकगठ्ठा मते देतात. मग निवडून कोण आणते ? अल्पसंख्यांक. मग त्यांच्याच जोरावर बहुजनांवर राज्य करणे सोपे नाही का ? म्हणायला भारतात हिंदू ८४ टक्के. राज्य कोणाचे ? सोनिया ह्या इटालियन ख्रिश्चन बाईचे. पंतप्रधान कोण ? शीख . विरोधी पक्ष कोण ? हिंदुत्व-वादी.
महाराष्ट्रात नुकताच आपण मुख्यमंत्री नवा आणला. तो लोकांनी निवडून दिलाय का? नाही , पण देतील निवडून यथावकाश ! हाच का ? ह्याचे वडील नेहरूंच्या मंत्रीमंडळात होते, आईही आमदार होती... हा अजून निवडून आला नाहीय, तर ह्याला कोणी केला मुख्यमंत्री ? सोनियाजींनी. त्यांची सासू एकेकाळी पंतप्रधान नव्हती का ? इंदिरा गांधी . अहो, ती पहिल्या पंतप्रधानांची, जवाहरलाल नेहरूंची मुलगी ना ! आता लवकरच ह्याच घराण्यातला राहूल गांधी गादीवर येणार आहे .
अगं अगं प्रजे, लवकर लप ! आज आहे प्रजासत्ताकाची लपालपी !

------अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

४ टिप्पण्या:

  1. Hindoo 84 takke asoonahi shikh, Italian sattaapramukh asaweet hey nidharmi paanaache dyotak naahi kaay?
    Mag hee gosht abhimaanaachi ki duraabhimaanaachi?

    उत्तर द्याहटवा
  2. "एनी फूल" अमेरिकेत अध्यक्ष होऊ शकतो अशी त्यांच्या लोकशाहीची ठेवण आहे, ज्यातून प्रजासत्ताकत्व दिसते. त्या मानाने आपले प्रजासत्ताक कसे बेगडी आहे हे मला दाखवायचे होते. धर्मनिरपेक्षता दिसत असेल तर सत्तेतली घराणे-शाही तुम्हाला का दिसू नये ? अर्थात हा तुमचा प्रतिवाद हे नापास होणार्‍या मुलाने दुसर्‍या कोणाला तर शून्यच पडलेत असे म्हणून समाधान करून घेण्यासारखेच आहे. असो.
    अरुण अनंत भालेराव

    उत्तर द्याहटवा
  3. अरुणराव, आपले वडील प्रख्यात पत्रकार अनंतराव भालेराव आहेत का? तसं असेल तर आपण इतक्या उथळ भाषेमध्ये लिहिणं बरोबर नाही. हेच विचार तुम्ही अधिक सभ्य भाषेत मांडू शकणार नाही का? ज्या कारणांनी तुम्ही नेमाड्यांना झोडपता तोच दोष मला तुमच्या वरच्या स्फुटातही दिसतो. तुमचा राग मी समजू शकतो, पण तो अधिक योग्य भाषेमध्ये मांडू शकता (ज्याचं बाळकडू तुम्हाला घरातूनच मिळालं असेल असं मी समजतो.) साऱ्यांना अरे-तुरे, अगं - तुगं कशासाठी? आपण रागवणार नाही, अशी आशा.

    उत्तर द्याहटवा
  4. राज्यकर्त्यांनी घराणेशाही अवलंबावी व प्रजेचे सत्ताकपण हिसकून घ्यावे हे बरे नव्हे, हे दाखवण्याचाच ह्या स्फुटात प्रयत्न आहे. "अगं,अगं, म्हशी" ह्या म्हणीचा विनोदी प्रयोग करण्यासाठी अगं,अगं,प्रजे असे लिहिल्याने प्रजेचा अपमान होत असेल तर माफी असावी ( अर्थात आपण, बघा किती मानाने लिहितोय, प्रजेत येत असाल तर !). वरील स्फुटात तुम्हाला असभ्यपणा दिसावा ह्याचे मात्र कौतुकच करायला हवे. अर्थात कोणाला कशात काय दिसेल त्याचा आजकाल नेम नाही हेच खरे. आपल्या अपेक्षांना तडा दिल्याबद्दल अपराधी वाटतेय. खैर यापुढे काळजी घेईन. आपल्या अभिप्रायाबद्दल ऋणी आहे. ---अरुण अनंत भालेराव

    उत्तर द्याहटवा