marathi blog vishva

रविवार, २७ फेब्रुवारी, २०११

अंधश्रद्धेची सीमा !
छापलेला शब्द हा खराच असतो, ह्या अंधश्रद्धेला आपण कितीतरी वेळा तावून सुलाखून तपासलेले आहे. नुकतेच शिवानंदन ह्यांनी सांगितलेय की तेल व वाळू माफीया विरुद्ध कारवाई करू नये, ती महसूल खाते करील, असे खुद्ध सरकारनेच पोलीसांना सांगितलेले असूनसुद्धा, केवळ जनतेच्या क्षोभाला शमविण्यासाठी पोलीसांनी कारवाईचे नाटक केले होते. आणि ह्या बातम्या आपण किती खर्‍या समजून वाचल्या होत्या. ते आता आठवून पहा. तरीही वेळोवेळी ही अंधश्रद्धा भल्याभल्यांना मोहविते. असीमानंदांचा कबूली-जबाब म्हणूनच ह्या अंधश्रद्धेच्या संभवनीयतेने ग्रासलेला आहे. टेहेलका व इंडियन एक्स्प्रेस मध्ये हे छापून आले आहे, म्हणजे ते खरेच असणार, हे फारच भोळेपणाचे ठरेल ! ( टेहेलकाचा बोभाटा करण्याचा लौकिक सर्वदूर पसरलेला आहेच !)
टेहेलकात दिल्याप्रमाणे असीमानंद हा कबूली-जबाब का देत आहेत हे पाहणेही मोठे सूचक आहे. त्यांना म्हणे कोणी कलीम नावाचा मुलगा जेलमध्ये बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना भेटला व त्याच्यावर कणव येऊन त्यांना ही उपरती झाली आहे. आता वाल्या कोळ्याने उपरती होऊन वाल्मीकी होण्याचे दिवस राहिलेले नाहीत, हे खुद्द असीमानंदांना तरी माहीत असायला हवे. आणि अर्थातच हे शिक्षामाफीचे समर्थन तर होऊच शकत नाही. करूणेचे दर्शन दहशतवादातही होऊ शकते एवढेच फार तर हे कारण सिद्ध करील. किंवा मग इतर काही प्रलोभने असतील.
असीमानंद आधी अंदमान निकोबार येथे व नंतर डांग जिल्ह्यात आदिवासींबरोबर काम करीत होते, ह्या पुण्ण्यावरही त्यांचा गुन्हा शीतल होत नाही. पण टेहेलका म्हणते की डांग मध्ये असताना ते ख्रिश्चन अल्पसंख्यांकाविरुद्ध खूप कडक बोलत असत. तर मग त्यांना हिंदू देवळांवर मुस्लिम दहशतवादी हल्ला करीत त्याचा बदला घेण्याची उबळ येणे हे कसे तर्काला, स्वभावाला, धरून होईल ? का ह्यात त्यांचा सर्व-अल्प-संख्यांक-सम-दुजा-भाव होता असे समजायचे ?
"मी सुनीलला म्हटले म्हटलं की समजौतामध्ये स्फोट झाला आहे व तू तर इथे बसला आहेस. त्यावर तो उत्तरला की हे त्याच्याच माणसांचे काम आहे." हा असीमानंदांचा कबूली जबाब कसा होतो ? मेलेल्या एका माणसाने त्याला असे सांगितले होते, हे फार तर तर्काने, त्या माणसाचा सहभाग सिद्ध करील. पण असीमानंदांनेच हे घडवून आणले असे चित्र ह्यावरून ठळक होत नाही. त्यांचे इतर स्फोटाचे कबूलीजबाब हे असेच तिर्‍हाइताच्या सांगण्यावरूनचे आहेत, हे लक्षात येतेच. कोणाही चाणाक्ष वकीलाला हे तर समजेलच. ते कोर्टाला किती पटेल हे अगम्य असले, तरी सामान्यांना ते तर्कावर टिकणे अवघडच वाटेल.
शिवाय सबंध कबूली जबाबात केवळ २० हजार अधिक ४० हजार रु. एवढ्याच रकमेचा उल्लेख व्हावा, आणि तरीही अनेक स्फोटमालीका ह्यांनी राबवाव्या हे गरीबांच्या दहशतवादाचेच लक्षण वाटेल. दहशतवादाचा गुन्हा झाल्यावर पोलीस आरोपींना पकडतात, त्यावर हिंदूंनी दबाव आणला, हे अल्पसंख्यांकांचा मंत्री संसदेत म्हणू शकतो. तो त्यांचा रास्त धर्माभिमान आहे असे आपण ठरवतो. पण मुस्लिमांनी असा दबाव आणून हिंदूंना पकडविले असे कोणी म्हणू धजेल तर निधर्मी राज्यव्यवस्थेला ते चालत नाही. तरीही आपले प्रजासत्ताक निधर्मी आहे, ह्या अंधश्रद्धेची ही सीमाच आहे !

-----------------------------------------