marathi blog vishva

सोमवार, २३ एप्रिल, २०१२


"इम्मॉरलस्‌ ऍनोनिमस"
    ज्यांना दारूचे व्यसन आहे व ते सोडायचे आहे त्यांच्यासाठी सगळ्या जगात एक संस्था आहे "अल्कोहोलिक्स ऍनॉनिमस" , म्हणजे "निनावी बेवडे". आठवड्यातून दोन वेळा ह्या संस्थेचे वर्ग होतात. त्यात पहिली अट अशी असते की नवीन येणार्‍या सभासदाने प्रथम कबूल करायचे की तो अल्कोहोलिक म्हणजे दारूचा व्यसनी आहे. त्यानंतर सगळे सुधारण्याचे वर्ग वगैरे.
    हे आठवण्याचे कारण की आजकाल कोणावरही काही लाचलुचपतीचे किंवा वाईट वर्तणुकीचे आरोप झाले की तो हमखास म्हणतो की हे आरोप करायचा तुम्हाला अधिकार नाही कारण तुम्ही कोणते साफ-सुथरे लागून गेलात. जसे: नुकतेच कॉंग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी ह्यांना राजीनामा द्यावा लागला, तो आरोप. त्यांच्या एका जुन्या ड्रायव्हरने काही रागाने त्यांच्या लैंगिक गैरवर्तुणीकीची एक सीडी प्रसिद्ध केली. यू-ट्यूब वर. आणि ती इतर ५० हजार लोकांसोबत मी ही पाहिली. त्यात बहुतेक वेळा मनु सिंघवी ह्यांचे टक्कलच दिसते, पण काही ठिकाणी एक बाई त्यांच्याशी रतिक्रीडा करते आहे हेही दिसते. आता ही अगदी खाजगी बाब आहे हे खरे, पण लगेच कॉंग्रेसच्या प्रवक्त्याने म्हणावे की भाजप ला तर असे आरोप करण्याचा काहीच अधिकार नाही कारण कर्नाटक व गुजरातेत त्यांचे खासदार असेच करतात. आता हे अजब नीती-शास्त्र आहे. फक्त चांगल्या लोकांनीच वाईटांना वाईट म्हणावे असा काही नियम नाही. किंवा चोराच्या घरी चोरी केली तर ती क्षम्य असते असेही नाही. वाईट ते वाईटच.
    सीतेवर संशय घेणारा य:कच्छित धोबी होता. त्याचे चारित्र्य फार धुतल्या तांदळासारखे होते अशातला भाग नाही. पण प्रभु रामचंद्रांना त्याच्या आरोपावर कारवाई करावीच लागली. वर सांगितलेल्या "निनावी बेवड्यांच्या" सभेत कोणी असे नाही म्हणत की मला दारू पिऊ नकोस असे म्हणणारा तू तर स्वत:च दारुडा आहेस. जे अनीतीच्या मार्गाने जातात त्यांना नीतीचा मार्ग कोणता हे दाखवण्याचा पूर्ण अधिकार आहेच. ख्रिश्चन धर्मात तर मी पापी आहे असे आधीच कबूल करावे लागते व मगच क्षमा याचना !
    त्यामुळे कॉंग्रेस व इतर पक्षाच्या प्रवक्त्यांनी हे न पटणारे नीती शास्त्र आता सोडून द्यावे व "निनावी बेवड्यांच्या" धर्तीवर "निनावी वाममार्गी" अशी संस्था काढून प्रत्येकाकडून आधीच कबूल करून घ्यावे की मी वाममार्गी आहे. हे ते राजकारणी जितक्या लवकर करतील तितका त्यांना सुधरण्याचा मार्ग लवकर सापडेल. ते कबूल करोत वा न करोत, जनता जाणतेच की सगळेच वाममार्गी आहेत. अण्णा हजारे जेव्हा म्हणाले की सगळे सांसद लुच्चे लफंगे आहेत तेव्हा सगळ्या खासदारांना काय राग आला होता. मनु सिंघवीही म्हणाले होते, हे बरे नाही. पानसिंग तोमार सिनेमात जेव्हा त्याला विचारतात की चंबळला राह्तोस तर मग तुझ्या कुटुंबात कोणी दरोडेखोर आहेत का ? तेव्हा तो उत्तर देतो की दरोडेखोर तर संसदेत असतात ना ?
    तर राजकारण्यांनो जितक्या लवकर कबूल कराल की तुम्ही सगळे चोर आहात तितक्या लवकर तुमचाच उद्धार होईल. "निनावी वाममार्गी" संस्था तुमची वाट पाहते आहे !
---------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
------------------------------------