marathi blog vishva

शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

निर्भीड व्हा----२१
"हिंदूंसाठी आता साचर समीती हवी !"
स्वामी असीमानंदांच्या कबूलीनाम्याने एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ते आता सर्वच बॉंम्बस्फोटात संबंधित होते असे उघडकीस येत आहे. तसेच त्यांच्याबरोबर इतके प्रचंड हिंदू लोक गुंतलेले आहेत की मालेगाव, मक्का मसजिद, समझौता एक्स्प्रेस अशा अनेक स्फोटांमागे हेच असीमानंद व हिंदू आतंकवादी होते असे चित्र स्पष्ट दाखविले जात आहे. असे एकाएकी हिंदू लोक इतके आतंकवादी कसे काय झाले असतील ह्याचा शोध घेतलाच पाहिजे.
हेच काम पूर्वी श्री. साचर ह्यांच्या समीतीने केले होते. पण ते होते मुस्लिम आतंकवाद्यांविषयी. त्यात त्यांनी मुस्लिम समाजाचा संपूर्ण आढावा घेतला होता व असे दाखविले होते की ह्या समाजाला बरे शिक्षण मिळत नाही, त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नोकर्‍या मिळत नाहीत, संसदेत त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही, हा समाज म्हणून मग ज्यास्त करून गुन्हेगारीकडे वळतो. ह्या समीतीच्या अहवालानंतर पंतप्रधानांनी जाहीर केले होते की देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचाच असला पाहिजे. त्यानुसार निरनिराळ्या योजना आखल्या गेल्या. केवळ मुसलमानी धर्मावरून शिष्यवृत्त्या दिल्या जात आहेत. तामिलनाडू व हैद्राबाद राज्यांमध्ये मुसलमानांना नोकर्‍यात पाच टक्के आरक्षण देण्यात आले आहे. असे सर्व बाजूंनी सर्वांनी हातभार लावल्याने आज हा समाज बराच प्रगत झाल्याचे दिसून येते आहे. समझौता एक्स्प्रेस स्फोटात ते नव्हते, मालेगावात नव्हते, मक्का मसजीदीत नव्हते, दिल्लीच्या बाटला एन्काऊन्टर मध्येही ते नव्हते, करकरेंच्या मृत्यूसही ते कारणीभूत नव्हते असे पुरावे सरकारकडे जमा होत आहेत.
आणि नेमके ह्याउलट हिंदू समाजाची वाटचाल गुन्हेगारीकडे व दहशतवादाकडे होऊ लागलेली आहे असा सबळ पुरावा आहे. भारतात हिंदू समाज बर्‍याच मोठ्या प्रमाणात आहे. त्याची अशी दशा होऊ देणे हे कोणत्याही सरकारला फार काळ परवडणारे नाही. आधीच ह्या समाजातून प्रचंड प्रमाणात लोक इतर धर्मात जात आहेत. त्यात भर म्हणून की काय आताशा ते स्वत:च्या धर्माबद्दल उदासीनही झालेले आहेत. तशात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर ती एक सुरक्षेची चिंताच होणार आहे. म्हणूनच मुसलमान समाजाच्या प्रगतीत मोलाचा वाटा जसा साचर समीतीच्या अहवालाने उचलला, तसाच प्रयत्न आता हिंदूंसाठीही होणे नितांत गरजेचे आहे.
म्हणूनच आमचे निर्भीडपणे आवाहन आहे की सरकारने सर्व हिंदूंच्या उद्धारासाठी एक साचर समीती लवकरच नेमावी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा