marathi blog vishva

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

निर्भीड--
अमर्याद परशुराम !
कोणी तरी टोचले की ज्या समाजाचा आद्य पुरुष परशुराम आहे, त्यांना अहिंसेबद्दल बोलायचा काही अधिकार नाही. परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती, एवढीच मला माहीती होती. त्यामुळे एक अपराधीपण आले. खरे तर आमच्या वडिलांनी ब्राह्मण्याच्या कुठल्याच लौकिक खुणा आम्हाला कधी दाखवल्या नाही. आमच्या कोणाच्या मुंजी झाल्या नाहीत. एका भावाने मराठा मुलीशी लग्न केले, आणि कुठलेच धार्मिक विधी आम्ही कधी केले नाहीत. वडिलांचे वा आईचे श्राद्धही आम्ही केले नाही. तरीही आम्ही ब्राह्मण आहोत असे कोणी म्हणाले तर ते लागतेच. त्यात मला तर ह्या आद्य पुरुषाविषयीही फारशी माहीती नाही. कोण होते परशुराम ?
विनोबा भावेंच्या शब्दात ( विनोबा सारस्वत--सं: राम शेवाळकर, साहित्य अकादेमी प्रकाशन ) हा त्या काळचा सर्वोत्तम पुरुषार्थी माणूस होता. आई क्षत्रीय तर बाप ब्राह्मण. हा भयंकर पितृभक्त होता. बापाच्या आज्ञेने ह्याने आईचे डोकेच उडविले. त्याकाळच्या क्षत्रीयांचा अत्याचार सहन न होऊन ह्याने २१ वेळा युद्ध करून पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती. तरीही क्षत्रीय राहिलेच. मग ह्याने अरण्ये तोडून कोकणात वस्ती केली व लोकांना चांगले विचार, आचार व उच्चार शिकविले व तुम्ही ब्राह्मण झालात असे घोषित केले. परशुराम रामभक्त होता. रामाच्या भेटीच्या वेळी राम झाडाला पाणी घालत होता त्यावरून त्याला झाडे कुर्‍हाडीने तोडण्याऐवजी झाडे लावणे हे महत्वाचे आहे हा बोध झाला व नंतर त्याने वनस्पतीशास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्याने शोधलेल्या अवजाराला "नव परशु" असे म्हणतात व कोकणात जी फळझाडे जोपासलेली आहेत त्याचे कारणही त्याचा हा अभ्यासच असावा. आईचे डोके उडविणारा, पृथ्वी नि:क्षत्रीय करणारा हा परशुराम शेवटी शेवटी आपल्या जीवनाचे सार समुद्रासारखे प्रवृत्तींची मर्यादा हेच आहे असे म्हणतो व केलेल्या हिंसेची उपरती दाखवतो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा भक्त असलेला हा परशुराम शेवटी संदेश देतो की "ॐ नमो भगवत्यै मर्यादायै".
स्खलन झाल्यावर त्यातून शिकणे व सावरणे ह्याला खूपच मोठेपणा लागतो व म्हणूनच ब्राह्मण समाजाने अजूनही परशुरामाला आपले आद्यपुरुष म्हणून मानले असेल. ह्याच न्यायाने परशुरामाला, किंवा ब्राह्मणांना आता अहिंसेबद्दल बोलायला काहीच हरकत नसावी.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

1 टिप्पणी:

  1. परशुरामांनी सहस्रार्जुन च्या अत्याचारांचा प्रतिकार केला तत्कालीन समाजावर जे जे अत्याचार सहस्रार्जुनाने केले त्याला परशुरामांनी त्याच पद्धतिने उत्तर दिले. त्यामुळे परशुरामांना हिंसक मानणे साफ चुकीचे आहे

    उत्तर द्याहटवा