निर्भीड व्हा---२०
गुरू नसतोच !
शरद पवारांचे राजकीय गुरू म्हणतात यशवंतराव चव्हाण हे होते. आता जर कोणी इतिहासकाराने शोधून काढले की कुठल्यातरी संबंधांने यशवंतराव ब्राह्मण होते तर किती पंचाईत येईल. आई जिजाऊ व बाल शिवाजी नांगर हाकताहेत व दादोजी कोंडदेव शेजारी बघताहेत ह्या पुतळ्यातला दादोजींचा पुतळा ते गुरू नव्हतेच म्हणून जसा कापून वेगळा काढला, तसा यशवंतराव व पवारांचा एकत्र पुतळा असेल तिथे पंचाईत होणार. किंवा पवारांना त्यांच्या गुंतवणुकीत जसे अनिरुद्ध देशपांडे चालतात, तसे झाले तर मग दादोजींचा कापलेला पुतळा परत जोडता येतो का ते पहावे लागेल.
पण कोणाला गुरू खरेच असतात का ? असते तर असे का होते की यशवंतरावांनी आयुष्यात कमाई केली अवघी एकदोन लाखाची ( हे परवा पवारांनीच सांगितले म्हणून कळले ! ) व पवारांची ? आता दोघेही भारताचे संरक्षण खाते सांभाळते झाले ह्यावरून त्यांना गुरू-शिष्य मानावे तर असे कसे की यशवंतराव कायम कुंपणावर बसण्याच्या नीतीचे पुरस्कर्ते तर पवार कुंपणानेच शेत खाणारे ? नसावेच ते गुरू पवारांचे !
आपण जर गुरूंकडून खरेच शिकत असतो तर साने गुरूजींचे सगळेच शिष्य कसे मृदू-मुलायम निघते . जे महात्मा गांधी मनोनिग्रहाचे एवढे खंदे पुरस्कर्ते त्यांचाच शिष्योत्तम ( जवाहरलाल नेहरू ) इतका मनस्वी निघावा ! जगाचा इतिहास सांगतो, गुरूंच्या आदेशांची पायमल्ली करणारे व ते धुळीस मिळवणारे हे शिष्यच असतात . अगदी येशू ख्रिस्तापासून हे चालू आहे. शिष्याचा हा विद्रोह पाहिला तर कसला आला आहे गुरू, हे कळतेच !
गुरूच्या असण्या नसण्याच्या पुराव्यासाठी इतिहासाची काही गरजच माणसाला लागत नाही. आता लोकमानसात कायम घर करून राहिलेले हे ऐतिहासिक प्रसंग पहा: कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सोडताना शिवाजी महाराजांनी तिला मातेसमान दर्जा देणे ( इतिहासकार म्हणतात, असा काही प्रसंगच घडला नव्हता ) ; महात्मा गांधींनी गोळी लागून खाली पडताना "हे राम !" म्हणणे ( त्यांचा पीए पुस्तकात म्हणतो की असे ते काही म्हणाले नव्हते !) . पण हा इतिहास कोणत्याही पुराव्याशिवाय लोकमानसात कोरलेला असतो. तो सहजी पुसता येत नाही. असेच दादोजींचे असेल ! ह्यालाच तत्वज्ञानात "जाणवलेले सत्य" ( परसीव्हड रिएलिटी ) म्हणतात. तो सिद्ध किंवा खोडण्याचा प्रयत्न करणे हे निष्फळ होते.
जो शिकवतो तो गुरू, अशी व्याख्या केली तर असे आढळून येईल की आपण कोणाच्या शिकवण्याने नाही तर आपल्या स्वत:च्याच शिकण्याने शिकतो ! दादोजी असण्याची काही गरजच नसते. मग ते ब्राह्मण असोत की मराठा ! ब्राह्मणांचा आद्यपुरुष परशुराम ह्या बाबतीत खरेच आदर्श आहे, असे विनोबा भावे म्हणतात. कारण त्याने लोकवस्ती नव्याने वसवताना वनस्पतीशास्त्राचा अभ्यास ( परशु हे हत्यार निर्माण केले) केला, रामाने वनस्पतीचे अगत्य दाखवून दिल्यावर झाडे तोडणे बंद केले, लोकांना वेद शिकवून त्यांना ब्राह्मण म्हणून घोषित केले, बापाची आज्ञा म्हणून क्षत्रीय आईची हत्या केली, व अंती ह्या सर्वाची परिणती म्हणून समुद्राकडे पहात समुद्रासारखे मर्यादेत रहावे, कुठल्याही टोकाला जावू नये, हा संदेश दिला. आणि हे सर्व तो स्वत:च्या अनुभवातून शिकला ! ( आता कोणी ब्रिगेड, लगेच परशुरामाचे पुतळे शोधायला लागेल ! )
नसलेल्या गुरूंचे असे असंख्य पुतळे नगरपालिकेने रोज जरी कापले तरी काही बिघडत नाही . कारण जनतेच्या लोकमानसात जे गुरू असतात, ते नसताना आरूढ झालेले असतात. तर ते काढण्याने जात नाहीत ! आणि मुळात गुरू नसतोच !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा