marathi blog vishva

बुधवार, २९ डिसेंबर, २०१०

निर्भीड व्हा---२०
गुरू नसतोच !
शरद पवारांचे राजकीय गुरू म्हणतात यशवंतराव चव्हाण हे होते. आता जर कोणी इतिहासकाराने शोधून काढले की कुठल्यातरी संबंधांने यशवंतराव ब्राह्मण होते तर किती पंचाईत येईल. आई जिजाऊ व बाल शिवाजी नांगर हाकताहेत व दादोजी कोंडदेव शेजारी बघताहेत ह्या पुतळ्यातला दादोजींचा पुतळा ते गुरू नव्हतेच म्हणून जसा कापून वेगळा काढला, तसा यशवंतराव व पवारांचा एकत्र पुतळा असेल तिथे पंचाईत होणार. किंवा पवारांना त्यांच्या गुंतवणुकीत जसे अनिरुद्ध देशपांडे चालतात, तसे झाले तर मग दादोजींचा कापलेला पुतळा परत जोडता येतो का ते पहावे लागेल.
पण कोणाला गुरू खरेच असतात का ? असते तर असे का होते की यशवंतरावांनी आयुष्यात कमाई केली अवघी एकदोन लाखाची ( हे परवा पवारांनीच सांगितले म्हणून कळले ! ) व पवारांची ? आता दोघेही भारताचे संरक्षण खाते सांभाळते झाले ह्यावरून त्यांना गुरू-शिष्य मानावे तर असे कसे की यशवंतराव कायम कुंपणावर बसण्याच्या नीतीचे पुरस्कर्ते तर पवार कुंपणानेच शेत खाणारे ? नसावेच ते गुरू पवारांचे !
आपण जर गुरूंकडून खरेच शिकत असतो तर साने गुरूजींचे सगळेच शिष्य कसे मृदू-मुलायम निघते . जे महात्मा गांधी मनोनिग्रहाचे एवढे खंदे पुरस्कर्ते त्यांचाच शिष्योत्तम ( जवाहरलाल नेहरू ) इतका मनस्वी निघावा ! जगाचा इतिहास सांगतो, गुरूंच्या आदेशांची पायमल्ली करणारे व ते धुळीस मिळवणारे हे शिष्यच असतात . अगदी येशू ख्रिस्तापासून हे चालू आहे. शिष्याचा हा विद्रोह पाहिला तर कसला आला आहे गुरू, हे कळतेच !
गुरूच्या असण्या नसण्याच्या पुराव्यासाठी इतिहासाची काही गरजच माणसाला लागत नाही. आता लोकमानसात कायम घर करून राहिलेले हे ऐतिहासिक प्रसंग पहा: कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सोडताना शिवाजी महाराजांनी तिला मातेसमान दर्जा देणे ( इतिहासकार म्हणतात, असा काही प्रसंगच घडला नव्हता ) ; महात्मा गांधींनी गोळी लागून खाली पडताना "हे राम !" म्हणणे ( त्यांचा पीए पुस्तकात म्हणतो की असे ते काही म्हणाले नव्हते !) . पण हा इतिहास कोणत्याही पुराव्याशिवाय लोकमानसात कोरलेला असतो. तो सहजी पुसता येत नाही. असेच दादोजींचे असेल ! ह्यालाच तत्वज्ञानात "जाणवलेले सत्य" ( परसीव्हड रिएलिटी ) म्हणतात. तो सिद्ध किंवा खोडण्याचा प्रयत्न करणे हे निष्फळ होते.
जो शिकवतो तो गुरू, अशी व्याख्या केली तर असे आढळून येईल की आपण कोणाच्या शिकवण्याने नाही तर आपल्या स्वत:च्याच शिकण्याने शिकतो ! दादोजी असण्याची काही गरजच नसते. मग ते ब्राह्मण असोत की मराठा ! ब्राह्मणांचा आद्यपुरुष परशुराम ह्या बाबतीत खरेच आदर्श आहे, असे विनोबा भावे म्हणतात. कारण त्याने लोकवस्ती नव्याने वसवताना वनस्पतीशास्त्राचा अभ्यास ( परशु हे हत्यार निर्माण केले) केला, रामाने वनस्पतीचे अगत्य दाखवून दिल्यावर झाडे तोडणे बंद केले, लोकांना वेद शिकवून त्यांना ब्राह्मण म्हणून घोषित केले, बापाची आज्ञा म्हणून क्षत्रीय आईची हत्या केली, व अंती ह्या सर्वाची परिणती म्हणून समुद्राकडे पहात समुद्रासारखे मर्यादेत रहावे, कुठल्याही टोकाला जावू नये, हा संदेश दिला. आणि हे सर्व तो स्वत:च्या अनुभवातून शिकला ! ( आता कोणी ब्रिगेड, लगेच परशुरामाचे पुतळे शोधायला लागेल ! )
नसलेल्या गुरूंचे असे असंख्य पुतळे नगरपालिकेने रोज जरी कापले तरी काही बिघडत नाही . कारण जनतेच्या लोकमानसात जे गुरू असतात, ते नसताना आरूढ झालेले असतात. तर ते काढण्याने जात नाहीत ! आणि मुळात गुरू नसतोच !

गुरुवार, १६ डिसेंबर, २०१०

निर्भीड व्हा-----१९
दबाव केव्हा येतो ?
दिग्विजय सिंगांचे "करकरे दबावाखाली होते" ह्या म्हणण्यासाठी हटून राहणे, काही तरी वेगळेच सुचवणारे आहे. समजा करकरे मालेगाव स्फोटानिमित्ताने दबावाखाली असतील तर असला दबाव केव्हा व कसा येतो ?
कोणाही मानसोपचारतज्ज्ञाला विचारा, आपल्या मनाविरुद्ध काम करावे लागले तर दबाव येतो असे म्हणतात. नोकरी धंद्यात आपण पाहतो की "जॉब सॅटिसफॅक्शन" हे त्यामुळेच महत्वाचे ठरते. जर रक्त पाहून कोणी बेशुद्ध पडत असेल, व त्याला आईवडिलांनी बळजबरीने डॉक्टरकीला टाकले असेल तर त्याला दबाव येतो. पंतप्रधान झालो तर आपले इटालियनपण सारखे त्रास देणार ह्या दबावापायीच सोनियांना "आतल्या आवाजाला" ओ द्यावी लागली. आता जर आणखी सांगाडे बाहेर आले तर आपली काही खैर नाही ह्या दबावापायीच तर जेपीसी नको आहे. एखाद्या पत्रकाराला कितीही जनमताच्या विरोधी लिहायचे धारिष्टय असते, पण आपण कोणाच्या दबावाखाली आपल्या मनाविरुद्ध काही लिहिले आहे, त्याचा त्याला ज्यास्त दबाव येतो. वीर संघवी व बरखा दत्तला विचारा . आपली जी धारणा असते त्याविरुद्ध वरिष्ठांनी काम करायला सांगितले तर त्याचा दबाव येतो. पोलिसाला जर निरपराध्यावर गोळ्या चालवा असे सांगितले तर तसे करताना त्याचे हात थरथरतात. दबाव येतो. दाऊदची टोळी एरव्ही इतक्या धमक्या देते त्याचे एखाद्याला काही वाटत नाही, पण आपण जर दाऊदच्या शूटरला कधी सोडले असेल तर ते उघडकीला येण्याचे दडपण येते. त्याला सोडताना दबाव येतो. एवढे कशाला, खोटे बोलणे शोधणारे जे मशीन आहे त्याचे सूत्रच आहे की मनाविरुद्ध खोटे बोलणार्‍याचे शरीरच मशीनद्वारे खुणा करते, दबाव दाखवते.
आता दिग्विजय सिंगांकडे फोनचे तपशील नाहीत, गृहमंत्रीसुद्धा तसा फोन झाला नव्हता म्हणतात तरी करकरेंवर दबाव असलाच तर तो वरिष्ठांच्या त्यांच्यामागे लावलेल्या मालेगाव स्फोटात हिंदू आतंकवाद्यांना कसेही करून पकडा ह्या दबावाचेच असणार आहे. एरव्ही रोज गुन्हेगारांना पकडणार्‍याला त्यांच्या धमक्यांचे काय हो ? दबाव असलाच तर तो मनाविरुद्ध कोणाला पकडावे लागले त्याचाच असणार आहे ! दिग्विजय सिंगाच्या सातत्यामुळे हे लक्षात तरी आले. कित्येकवेळा शाहण्यांच्या शोधातून सापडत नाही ते कोणाच्या बरळाने सहजी लख्ख दिसून जाते, ते असे !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

रविवार, १२ डिसेंबर, २०१०

निर्भीड व्हा-----१८
दिग्विजयाचे दिगहरण करा !
अंतुले ह्यांनी लोकसभेत जो तमाशा केला होता तसाच आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे महासचीव, श्री.दिग्वीजय सिंग करीत आहेत. त्यांच्या मते ते करकरेंना २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या ३ तास अगोदर फोनवर बोलले होते. आणि करकरेंनी त्यांना हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी धमकी दिली होती असे सांगितले होते. असेच वक्तव्य राजदीप सरदेसाई ह्यांनी सुद्धा २६/११ च्या बातम्या दरम्यान केले होते. ह्या उलट विकीलीक्सच्या गौप्यस्फोटाप्रमाणे अमेरिकन राजदूत त्यांच्या अध्यक्षाला सांगतो की ह्या हल्ल्यात हिंदुत्ववादी अतिरेकी नव्हते, तरीही धर्माचे राजकारण अंतुलेमार्फत कॉंग्रेस सरकार करीत आहे. अमेरिकन राजदूत हे अध्यक्षाला का सांगत आहे ? कारण ह्या हल्ल्यात अमेरिकन नागरीक कामी आलेले आहेत व अमेरिकेत असा कायदा आहे की अमेरिकन नागरीक जिथे कुठे असेल तिथे त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी अमेरिकन सरकारची आहे. हा काही नुसताच पोकळ कायदा नाही तर त्याची अमलबजावणी अमेरिकन सरकार सार्‍या जगात करते हे मी स्वानुभावाने सांगू शकतो. आम्ही कॅनडाला जाताना आमचा ( भारतीय ) फॉर्म वेगळा व मुली व नातवंडांचा ( ते अमेरिकन नागरीक ) फॉर्म वेगळा भरावा लागला होता. ह्याच पद्धतीमुळे काठमांडूच्या ओलीत धरलेल्या विमानात किती अमेरिकन नागरीक होते ते त्यांना तात्काळ कळले होते. तसेच एका अमेरिकन पत्रकाराचा खून पाकिस्तानात झाला तेव्हा त्यांच्या सरकारने त्याचा शेवटापर्यंत तडा लावला होता.
अमेरिकेच्या राजदूता पुढे अंतुले व दिग्वीजय सिंगांचे म्हणणे कसे खोटे पडणारे आहे हे अजूनही दुसर्‍या उदाहरणाने बघता येईल. हिंदुत्ववादी अतिरेकी इतके जर खतरनाक असते की जे करकरेसारख्याचा परस्पर काटा काढू शकते तर मग त्यांना मिळणारी वागणूक व कसाबला मिळणारी वागणूक ह्यात सरकार फरक का करते आहे. साध्वी प्रज्ञा आजारी पडते तेव्हा तिला जे.जे. सरकारी इस्पितळात कोणालाही पाहता येईल अशा वार्डात ठेवण्यात येते तर कसाबसाठी कित्येक कोटी खर्च करून स्पेशल व्यवस्था करण्यात येते व शिवाय त्याची जातीने गृहमंत्री चौकशीही करतात. बरे हिंदुत्ववादी इतके जर सरकारवर दडपण आणणारे असते तर सुषमा स्वराज ह्यांनी लेखी देऊनसुद्धा थॉमस ह्यांची नेमणूक सरकार करू धजलेच नसते. सरकारात नसल्याने ज्यांचा दबाव येणेच शक्य नाही त्या हिंदुत्ववाद्यांचा पहा किती जोर आहे की त्यांनी करकरेसारख्यांना परस्पर उडवले असे म्हणणे हा केवळ तर्कटाचा दहशतवाद आहे. आणि इतका जर हिंदुत्ववाद्यांचा धाक आहे तर मग अजूनही अफजल गुरूला फाशी का मिळत नाहीय ? आता कोणालाही पटेल की हिंदुत्ववाद्यांचा बागुलबुवा हा विकीलीक्स म्हणते त्याप्रमाणे एक धर्माचा खेळ करणे आहे. आणि हे आपण निर्भीड होत जाणले पाहिजे.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com