-------------------------------------------------------------------------------------------
निर्भीड व्हा----३५
थोबाडीत देणे
वयाच्या कोणत्या वर्षात "थोबाडीत देणे" सहन करावे लागते, त्याप्रमाणे त्याची दाहकता असते. शालेय शिक्षणात साधारणपणे आठ दहा वेळा तरी थप्पड खावी लागते. आपण म्हणतो की त्याचे काही एवढे वाटत नाही, पण ज्याला थप्पड बसते त्याला ती फार अपमानास्पदच वाटते. म्हणून तर "थोबाडीत देणे" हा प्रकार इतका मोलाचा असतो. एखाद्या पोरीने मुलाला थप्पड दिली की तो त्या दिशेने कधी जाणार नाही, इतकी ही थप्पड प्रभावी असते. कायद्याने हा हल्ला मानावा, तर ह्यात फारशी काही शारिरिक इजा होत नाही. ही काही फार गंभीर हिंसा नसते. शारिरिक दु:खापेक्षा अपमानच ज्यास्त असतो. कोणत्याही वादावादीत अगदी जालीम प्रत्युत्तर म्हणजे "थोबाडीत देणे" हेच असते. आपण ते नेहमीच देऊ शकत नाही, हा भाग वेगळा. पण कित्येक वेळा वादाची परमावधी थोबाडीत देण्यात व्हावी असे आपल्याला नेहमीच वाटते. केवळ ह्याच सामाजिक परिणामामुळे मराठी शब्दकोशात "थोबाडीत देणे" ह्याचा अर्थ "चांगली अद्दल घडविणे" असाही देतात.
आपण ज्याला थोबाडीत देतो त्याचा अपमान करीत असतो. आता ह्या हरविंदर ह्या गृहस्थाने मागच्याच आठवड्यात सुखराम ह्या ८६ वर्षांच्या माजी मंत्र्याला थोबाडीत दिले होते. कोण आहेत हे सुखराम. हे फार पूर्वी दूर-संचार मंत्री होते. ह्यांच्यावर नाना भ्रष्टाचाराचे आरोप झाले. सीबीआयची रेड पडली तेव्हा ह्यांच्या घरात इतके पैसे होते की, ते ठेवायला ह्यांच्या घरी कपाटे अपूरी पडल्याने चार पाच कोटी रुपये चादरीत गुंडाळून देवघरात ठेवलेले सापडले होते. त्यानंतर त्यांच्यावर रीतसर खटले भरून आता ८६व्या वर्षी ह्यांना ५ वर्षांची शिक्षा झाली आणि त्यांना तिहार जेलमध्ये राजाच्याच कोठडीत ठेवले आहे. अशा माणसाला कसला आला आहे मान आणि अपमान. आता अशा निगरगट्ट भ्रष्टाचार्याला कोणी थोबाडीत दिले तर अजून काय मोठा अपमान होणार आहे ? खरे तर तो थोबाडीत देण्याचाच अपमान होईल. जेव्हा काही अघटित घडते तेव्हा आपण म्हणतो की "मेरूला मुंग्यांनी तर गिळले नाही ना" ? तर अशीच परिस्थिती सध्याच्या राजकारणात आलेली आहे. वाईट माणसांनी चांगल्यांची इतकी गळचेपी केलेली आहे की अशांना थोबाडीत दिली तर ती थप्पड मारण्याचाच अपमान व्हावा.
थप्पड खाल्लेला माणूस त्यावर काय प्रतिक्रिया देतो त्यावरून त्या माणसाची नीतीमत्ता दिसून येते. शाळेतला एखादा कोडगा मुलगा असेल तर तो हमखास थोबाडीत दिल्यावरही म्हणेल "काहीच लागले नाही !". एखाद्याचा खरेच अपमान झाला असेल, तर तो चक्क रडेलच. थप्पड खाणार्याला राग तर हमखास येतोच. आता त्यावर तो बदला घेवो अगर न घेवो, पण राग आलाच पाहिजे. एवढी वर्षे मानाची पदे भूषविल्यावर, जीवनाच्या शेवटी कोणावर थोबाडीत खाण्याचा प्रसंग यावा ह्याचा खरे तर रागच यायला हवा. कोणी साने गुरुजींचा वा येशू ख्रिस्ताचा अवतार असेल तर ती गोष्ट वेगळी व त्याने जरूर म्हणावे की "ह्या वेड्याला तो काय करतोय ते कळत नाही म्हणून हे देवा तू ह्याला माफ कर". तर तो भाग वेगळा. पण ह्या वयातही जे निरनिराळ्या लव्हासासारख्या योजनांच्या आकांक्षा बाळगून आहेत, राजकारणातल्या धामधुमीत अजूनही व्यस्त आहेत, त्यांना ह्याचा रागच यायला हवा होता. त्यांनी लगेच ट्विटरवर असे का म्हणावे, की "लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा हक्क आहे, फक्त तो रास्त मार्गाने मांडावा !" आता थोबाडीत देणारा काय आपले म्हणणे मांडत असतो काय, की जे आवाजी मतदानाने तुम्ही ते नेहमीच फेटाळून लावू शकता ? त्याचे थोबाडीत देणे हा त्याने दिलेला सणसणीत निकाल असतो. आम्ही चर्चेला तयार आहोत असे सत्ताधारी पक्षाने म्हणणे हे नेहमीच त्यांची समजूत दाखवते असे नसून सध्याच्या काळात ती "तुम्ही काहीही मांडा, आम्हाला काही फरक पडत नाही" अशी सत्तेची उद्दाम मग्रूरीच ते वागण्याने दाखवीत असतात. सामाजिक काम करणार्याने, "हे चालायचच" असं म्हणून कोडगे होता कामा नये. जनाची नाही तर मनाची थोडी राखायलाच हवी व आपल्या वागण्याची तपासणी करून परत कोणी असे करू धजणार नाही असे वागणे हवे ! हे कोणा माथेफिरूचे काम नसून तुमच्या वर्तुणुकीवर उमटलेला दैवी संकेत आहे असेच हे समजायला हवे !
-------------------------------------------------
देशातील महागाईच्या भडक्यानं जनता हवालदिल झाली असताना, आज एका तरुणाच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यानं राजधानी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या श्रीमुखात भडकवली. हरविंदर सिंग असं या तरुणाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यानंच माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावरही हल्ला केला होता.
उत्तर द्याहटवा