marathi blog vishva

मंगळवार, २६ जुलै, २०११

------------------------------------------------------------------------------------------------

निर्भीड व्हा----२८
मूर्तींचा सोपा तोडगा !
चपला बुटांचा शोध लावतांना म्हणे ज्या इतर आयडिया विचारात घेण्यात आल्या होत्या, त्यात एक होती की, सगळ्या पृथ्वीवर गालीचा किंवा आवरण आच्छादावे. आता हे किती अवघड काम ! म्हणून कोणी सुचविले की ह्याऐवजी आपल्या पायाभोवतीच काहीतरी चपलेसारखे का लपेटू नये ? आणि माणसाने पादत्राणांचा शोध लावला . हा शोध त्याने मग आजतागायत अवलंबिलेला आहे. कोणत्याही सोप्या कल्पनेचे हेच भागधेय असते. लोक सोपी कल्पना उचलून धरतातच व ती अवलंबीतात. फक्त ती सोपी आहे हे कळायचा अवकाश !
असेच आहे भ्रष्टाचारावरच्या निरनिराळ्या तोडग्यांचे. काहींना वाटते भ्रष्टाचार्‍यांची मालमत्ता अमूक मर्यादेनंतर गोठवावी, काहींना वाटते राजकारण्यांवर अंकुश हवा, सामर्थ्यवान लोकपालाचा . तर काहीना वाटते भ्रष्टाचार्‍यांना फाशीसारखी कठोर शिक्षा द्यावी. नाना लोकांची नाना मते. त्यापैकी परवा इन्फोसिस कंपनीचे प्रवर्तक श्री.नारायण मूर्तींनी सुचविलेली कल्पना पहा कशी सोपी वाटणारी आहे. त्यांचे म्हणणे आहे की भ्रष्टाचार कायदेशीर करा. म्हणजे काय करा ?... असे तर नाही की भ्रष्टाचार राजरोस करू द्या ?... नाही, नाही, मूर्ती म्हणताहेत की लाच देणार्‍याला ती देणे माफ करा, ती कायदेशीर करा. आजकालच्या कायद्यांनुसार लाच देणारा व लाच घेणारा हे सारखेच दोषी धरल्या जातात. त्या ऐवजी मूर्ती म्हणताहेत की लाच देणार्‍याला पकडू नका, त्याचे लाच देणे कायदेशीर करा. एक उदाहरण घेऊ. समजा २-जी परवान्यासाठी इन्फोसिसला मंत्र्याला लाच देणे आवश्यक वाटते तर त्यांनी चक्क आपल्या वहीखात्यात सरळ नोंद करावी की २-जी परवान्यासाठीचा वरचा खर्च व त्यावर योग्य ते कर भरून मंत्र्याने घेतले तर चेकने पैसे द्यावेत. आता मिळालेले पैसे कसे कायदेशीर आहेत हे मंत्र्याने आपल्या सीएला समजवावे वा तसे करून घ्यावे. म्हणजे लाच देणे एक प्रकारे कायदेशीरच झाले की !
कित्ती सोप्पी कल्पना आहे ना ! पण तितकीच बहुगुणीही आहे. साधारणपणे लाच ही रोख, वा वस्तूत ( जमीन जुमल्यात, वा सोन्या-चांदीत ), देतात. देणारा व घेणारा मग ती पांढर्‍या उजळ-माथ्याच्या व्यवहारांपासून लपवतो व काळ्या पैशाची निर्मिती करतो. अशी स्वतंत्र व कितीतरी पटीनी मोठी अशी भारतीय काळ्या पैशाची अर्थव्यवस्था आहे, हे आपल्याला कोणी पटवायला नको. मग अशी उजळ माथ्याने लाच दिली तर, ती देणार्‍याने पांढर्‍या पैशात दिल्याने, निदान निम्मी तरी काळ्या पैशाची अर्थव्यवस्था गोरी होईल. हा केव्हढा फायदा . ह्याने सरकारचेही उत्पन्न वाढेल, कारण पांढर्‍या पैशात लाच देणारा, कर तर देईलच ना ! त्याने तीच लाच काळ्या पैशात दिली असती तर तो सरकारचा करही बुडला असता.
कदाचित ह्याच देण्याघेण्याच्या व्यवहारावर विंदा करंदीकरांसारखे आपल्याला मग म्हणता येईल....देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेणार्‍याने घेता घेता....देणार्‍याचेच हात घ्यावे !

---------------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा