marathi blog vishva

बुधवार, १३ एप्रिल, २०११

निर्भीड व्हा-----२४
अण्णांचे कवित्व
"होळी रे होळी, साहेबाच्या......." हे जसे शिमग्याचे कवित्व, शिमग्यानंतर मागे राहते, तसे जंतर-मंतरला जो अण्णांचा लाइव्ह-शो झाला, त्याच्या मागे काय राहते ? जर हा तमाशा नीट काळजीपूर्वक पाहिला असेल तर खालचे कवित्व तुम्हाला दिसलेच असेल:
१) लाल युनिफॉर्म घातलेली केजीची पाच सहा वर्षांची मुले ( चांगली ४०/५० ) दोन तीन बायका तिथे घेऊन आल्या होत्या. "अण्णासंगं न्याहरी" असे पॅकेज होते की काय ? चाचा नेहरू नंतर आता चाचा अण्णांना एक गुलाबाचे फूल मिरवायला हरकत नाही !
२) हेडलाईन्स-टुडे-वाला शाळकरी मुलींची मुलाखत घेत होता. त्यांना राळेगण-सिद्धी सुद्धा म्हणता आले नसते, पण त्या बोलत होत्या भ्रष्टाचारावर. त्यांना जर कोणी हे लोकपाल काय प्रकरण आहे ते समजावले असते तर खरेच शिक्षण झाले असते, जंतर-मंतरच्या जादूने.
३) सबंध पाच दिवसाच्या पॅकेज मध्ये कोणाही आयोजकाने सरकारचे लोकपाल बिल व आमचे बिल ह्यात काय फरक आहे, ते सांगितले नाही. कुठे तसे बॅनर्सही नव्हते.
४) चौथर्‍यावर गाद्या अंथरलेल्या होत्या. त्यामुळे तिथून बोलताना वक्त्यांना "घुटने टेकून" उभे राहात बोलावे लागे. केजरीवाल तरुण असल्याने ते सहजी करू शकले पण बाकीचे मेटाकुटीला आलेले दिसत होते. सरकारने "घुटने " का टेकले हे मात्र आता ह्यावरून कळते.
५) उपोषण सोडताना बरोबरच्या दिडशे जणांना अगोदर "पाणी पाजले" हे योग्यच. पण अण्णांना एका कोपर्‍यात नेले व एकच पेला दिला. त्यातून ते सगळ्यांना कसे घोट पाजणार ? मग ते त्यांच्या तोंडाला बाटलीच लावू लागले. ( बाटली संस्कृती की जय ! ) मग ती बाटलीच देऊन टाकू लागले. एका बाईला बाटलीने घोट घेणे जमेना, मग तिने नुसती बाटलीच हाती घेतली. अण्णांना ज्या चिमुरडीच्या हातून निंबू पाणी दिले ( काही चॅनेल्स म्हणू लागले दूध दिले ) ती चांगलीच भांबावलेली होती. किरण बेदींना आपले कौशल्य वापरून पाणी देणे, वगैरे कामे चौथर्‍यावर करावी लागली. एवढा प्रचंड सपोर्ट आणि तिथे चार स्वयंसेवक नसावेत ?
६) दोन तीन जण सारखे अण्णांच्या कानात काही तरी सांगत होते. अण्णांना इंग्रजी नसेल येत तर त्याचे काय एवढे ? प्रश्न विचारणारे तरी हिंदीतच विचारत होते. ज्या नेत्याचे सारखे कान भरवावे लागतात त्याचे कसे काय होणार ?
७) मराठी भाषा अभिमान्यांनी मात्र ऋणी राहावे, असे मराठी, अण्णांनी हिंदीवाल्यांच्या माथी मारले "आपका कुछ गैरसमज है", "अजून छह दिवस मुझे कुछ होगा नही, आप फिकिर मत करना" वगैरे.
८) उपोषण सोडल्यावर दोन तरुण ( पोनी-टेल वाले ) अनाहूतपणे गिटार घेऊन लगानचे गीत गाऊ लागले व त्यावर अण्णाही टाळ्या वाजवू लागले. एवढ्या मोठ्या ताफ्यात दोन चांगले गाणारे असू नयेत ? निदान मेधा पाटकरांकडे जशा आदिवासी गाणार्‍या आहेत तशा तरी असाव्यात. रोड शो च असा विस्कळित असेल तर कमीटीचे काम कसे शिस्तबद्ध होईल ?
९) मेधा पाटकर जेव्हा रस्त्यालगत उपोषणाला बसतात तेव्हा त्या तिथेच झोपतात. अण्णा दिवेलागणीनंतर कुठे जात असत ? पाच दिवस उपवास केल्याचा कुठलाही ताण त्यांच्या बोलण्यात दिसला नाही. उपोषणाने एक दिव्य तेज येत असेल तर ते त्यांच्या चेहर्‍यावर न दिसता, त्यांना बोलण्यात नेमके कसे मदत करीत होते हे नवलाचे आहे.
१०) कमीटीत आता अण्णांचे पाच, सरकारचे पाच, व दोन चेयरमन/को-चेयरमन अशी बारा मते धरली तर निर्णय कसा होणार ? सहा -सहा जण नक्कीच विभागणार. मग जनतेची लोकशाही चालणार की सरकारची ? का परत जंतर-मंतरचा रोड शो ?


--------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा