marathi blog vishva

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

प्रती ज्ञानेश्वर नेमाडे,--ज्ञानेश्वराला काय दाखवतात ?
"हिंदू" ह्या प्रचंड खपलेल्या भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा:
"एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
ही संत ज्ञानेश्वरांची अतिशय हीन पातळीला जाऊन केलेली बदनामी आहे.
"संतसूर्य तुकाराम" कादंबरीत तुकारामाने तरुणपणी दुकानात आलेल्या पोरींच्या हातावर गोळी ठेवण्याच्य़ा मिषाने स्पर्श केला ( व इतर स्त्रिसुलभ आकर्षण दाखवले ) तर केवढा गहजब झाला. संमेलनाध्यक्षपदही गेले आनंद यादवांचे आणि इथे तर लेखक ह्या वेसकराला ज्ञानेश्वरांना हे काय भलतेच दाखवायला लावतोय. व वर परत फ्राइडचा सिद्धांत, दृष्टांत वगैरे. ह्याचा धिक्कारच व्हायला हवा.
कायदेशीर कारवाईही व्हायला हवी.
कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी स्टार माझा वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. शिवाय फ्राइड व खुद्द ज्ञानेश्वरांच्या काही ओळी उदधृत करून ते असे मांडत आहेत की ही ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारावरची ही रास्त प्रतिक्रिया आहे. जसे काही खुद्द ज्ञानेश्वरांच्या ओवीमधूनच हे सिद्ध होते.
ही जाणून-बुजून केलेली चतुराई व बदनामी आहे.ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ आता ह्य़ात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो.
शिवाय ह्या वेडसर वेसकराने धोतर उचलून जे दाखवले ते लेखक म्हणतो तसे "आम्हा पोरांना". त्यात महानुभावी पंथाचे लेवा पाटील नेमाडे व त्यांचे ब्राह्मण नसलेले मित्र आहेत. त्यामुळे हा दाब असलाच तर कुणब्यांच्या विरुद्धचा आहे. ब्राह्मणांच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या विरुद्धचा अजिबात होत नाही. लेखक हेच पुढे कबूलतो ते असे : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणेही वाईट व निषेधार्यच आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच.
प्रति-ज्ञानेश्वर नेमाडेंना एकमेवाद्वितीयतेचा गर्व जरूर व्हावा पण ते माउलींचा असा अपमान करू शकत नाहीत.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

1 टिप्पणी:

  1. खरंय! पण मी परवा म्हणालो तसं. ब्राह्मण डिवचायला खूप सोपे असतात. शिवाय डिवचल्या गेल्या नंतर ब्राह्मणांनी काही ओरड केली अथवा काही तार्किक अर्ग्युमेंट उभी केली तरी ती जुमानायची नाही आणि "तुम्ही तर ब्राह्मणच आहात, म्हणूनच या आमच्या अभिव्यक्तीला विरोध करता" असं कोणतंही पटणारं तार्किक आर्ग्युमेंट न करता म्हणायचं! असा हा डाव आता जुना झालाय. आणि ब्राह्मणदेवषाची गरज़, चटक, हाव, हौस इ. सगळ्याचीच गर्दी आहे. हे फारच complex आहे.

    उत्तर द्याहटवा