marathi blog vishva

शनिवार, ३ एप्रिल, २०१०

निर्भीड : ४

सानिया-शोएब : स्लीपींग विथ द एनेमी

जॉर्ज बुश यांचे एक प्रसिद्ध वाक्य होते की तुम्ही एकतर आमच्या बरोबर आहात, नाही तर आमच्या विरुद्ध आहात . ( यू आर आयदर विथ अज ऑर अगेन्स्ट अज ) . आता पाकिस्तान हे काही आपण आपले मित्र-राष्ट्र म्हणू शकत नाही. म्हणजे बुश-नीती प्रमाणे ते आपले शत्रू-राष्ट्रच म्हणायला हवे. मग सानिया मिर्झा पाकीस्तानी कप्तान शोएब ह्याच्याशी लग्न करणार, म्हणजे "स्लीपींग विथ एनेमी" च झाले की. अर्थात् असे लग्न करणारी ती काही पहिलीच नाही.

बर्‍याच भारतीय लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आहे, हे बर्‍याच पालकांना माहीत असेल. किंवा बरेच पालक कधी एकदा आपल्या मुला-मुलींना अमेरिकन नागरिकत्व मिळते असे झालेले असतात. पूर्वी अमेरिकन नागरिकत्वाची परीक्षा देताना व नंतर ती शपथ घेताना म्हणे असे म्हणावे लागे की भारताशी युद्ध झाले तर आम्ही अमेरिकेकडून आमच्या नातेवाईकांविरुद्ध लढू. कित्येक भारतीयांना ही शपथ घेताना अगदी रडू यायचे, पण इतर फायदे बघता सगळ्यांचा ओढा तिकडेच असायचा. आणि गंमत बघा आज वीस वर्षांनंतर ह्यांची मुले शाळेत भांडतात की तुम्ही आम्हाला भारतीय म्हणून कमी मार्क देता. म्हणजे मुले, आई-वडील कायद्याने अमेरिकन पण ते त्यांना लेखतात अजूनही भारतीय. अशीच काहीशी कोंडी सोनियाजींची झाली होती. राजीव गांधीमुळे त्या झाल्या भारतीय, पण त्यांच्यावर ठपका ठेवला गेला ईटालियन असण्याचा. त्यापायी बिचारीला पंतप्रधानपद सोडावे लागले. शरद पवारांनी ह्याच मुद्द्यावर वेगळी कॉन्ग्रेस काढली होती. नशीबाने राहूल वा प्रियांका ह्यांना लोक भारतीयच समजतात.

आता राहूल गांधी ह्यांनी समजा कोणा पाकिस्तानी मुलीशी ( उदा:बेनझीरच्या ) लग्न केले, ( अफवा अशी आहे की ते कोणा स्पॅनिश मुलीशी लग्न करणार आहेत.), तर सर्व प्रश्न आपल्याला चुटकीसरशी सोडवावे लागतील. म्हणजेच सोडून द्यावे लागतील. कारण मग "माहेरची साडी" चा प्रयोग होईल.

समजा सानिया मिर्झा डेव्हिस कप भारताकडून खेळली आणि शोएब पाकिस्तान कडून खेळला तर सामन्या आधी व नंतर आपल्याला आठवेल तोच जुना सिनेमा : स्लीपींग विथ द एनेमी !

अरुण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा