marathi blog vishva

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०११

ऑक्युपाय निरूपाय !
जगातल्या एकूण १९० देशांपैकी ९० देशात सध्या एक अफलातून चळवळ चाललेली आहे. ह्या चळवळीचे नावही जरा विचित्रच आहे. ते आहे : "ऑक्युपाय वॉल स्ट्रीट". गेली ३५ दिवस शेकडो लोक न्यूयॉर्क येथे झुकोटी पार्क येथे कडाक्याच्या थंडीत तंबू ठोकून त्यात रहात आहेत. काय मागत आहेत ते ? तर शेअर मार्केट ( अमेरिकेचे शेअर मार्केट वॉल स्ट्रीट नावाच्या रस्त्यावर आहे, त्यामुळे वॉल स्ट्रीट म्हणजे शेअर मार्केट असे समजतात ) मधल्या कंपन्यांनी त्यांचा लोभ कमी करावा, बेकारी कमी करावी, नोकर्‍या वाढाव्या, ह्यासाठी. बरे ही चळवळ कोणी वेडे लोक चालवत नसून, ते इंटरनेटवर ह्यासाठी प्रचंड निधी गोळा करीत आहेत, निदर्शकांच्या जेवणाचा खर्च वगैरे त्यातूनच होतो आहे. हे लोण इतके वेगाने पसरते आहे की रोम, इटली ( सोनियांचा देश ) येथे तर निदर्शक हिंसक होऊन त्यांनी जाळपोळही केली. युरोपभर ह्या चळवळीचे लोण पसरत आहे व त्यात ग्रीसचे गडगडणे, स्पेनचे अडखळणे, जर्मनीचे सांचलेपण वगैरे बाबी आगीत तेल ओतीत आहेत. परवा GPS ह्या सिएनएन वरच्या फरीद झकेरिया ( हे आपल्या रफीक झकेरियांचे चिरंजीव ) ह्यांच्या कार्यक्रमात पॉल क्रुगमन ह्या नोबेल विजेत्या अर्थशास्त्रज्ञाने ह्याची तीव्र दखल घेतली.
काय आहे ह्या चळवळीच्या मुळाशी ? आढावा घ्यायचा तर मी जानेवारी २००९ मध्ये किर्लोस्कर मासिकात लिहिलेल्या प्रदीर्घ लेखाची ( "कळावे. लोभ नसावा.") उजळणी करायला हवी. मी त्या लेखात दाखविले होते की मुक्त-अर्थव्यवस्थेत स्पर्धा असूनही अनेक उद्योगधंद्यांनी आपापली अपार लोभाची कुरणे तयार केलेली आहेत व त्यामुळे ग्राहकांची गळचेपी होते. ह्यात मी दाखविले होते की बांधकाम क्षेत्रात कसे बांधण्याचा खर्च केवळ १५०० रु,प्रति चौ.फुट असूनही घरे १० ते २० हजार प्रतिचौरस फुटाने विकली जातात. व त्यात हितसंबंध गुंतलेल्यांचा ( ह्यात आपण घरमालकही एक हितसंबंधी असतो.), हातभार लागतो. शिवाय ह्यात क्षेत्रफळाच्या न मोजण्याच्या युक्त्या कशा असतात. तसेच मोटार कार, वाहन उद्योग, कपडा-लत्ता, पुस्तके, रस्त्यांचे टोल, पिण्याच्या पाण्याचा बाटली व्यवसाय, शिक्षण-क्षेत्रातले लोभ, वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टरांचे व औषधी कंपन्यांचे लोभ, शेअरबाजारातील लोभ, कलाक्षेत्रातील लोभ, व छोट्या उपकरणांचे लोभ असे सर्वांगीण जीवनाला व्यापणार्‍या उद्योगात लोभ कसा बोकाळलाय हे दाखवले होते. व तो कसा नसावा हे मागे आपण पत्राच्या शेवटी जे पारंपारिकपणे लिहायचो "कळावे. लोभ असावा." त्याला बदलून लोभ नसावा ह्या भावनेचे विचार आज तीन वर्षांपूर्वी मांडले होते. परिस्थितीत आज अजूनच बिघाड झालेला असून लोभ अगदी प्रमाणाबाहेर व हाताबाहेर गेला आहे, असेच आजचे चित्र असून ह्याच वरची प्रतिक्रिया म्हणून वरील चळवळ सुरू झालेली आहे.
बरे ह्या लोभापायी लोकांचे रोजगार कमी झाल्याने जीवनात अडचणी येत आहेत. एकेकाळी मुंबईत जॉर्ज फर्नांडिस ह्यांनी मजूरांचा लढा लढताना ताकीद दिली होती की आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पंचतारांकित हॉटेले व प्रासादिक घरे जबरदस्तीने व्यापू व ती सोडणार नाही. ती धमकी आज अशा चळवळींनी खरी होण्याची लक्षणे दिसत आहेत. परवा अण्णा हजारेंना एनडीटीव्ही वर इंडियन ऑफ द ईयर पुरस्कार देताना लालूजी म्हणाले की देशातल्या स्थावर मालमत्तेचा एकदा सर्व्हे करायला हवा व त्या ताब्यात घेऊन त्यांचे काही निकषांवर पुनर्वाटणी करायला हवी. २७ मजल्याचे मुकेश अंबानींचे टोलेजंग घर, व मल्ल्या ह्यांचे ३४ व्या मजल्यावरचे बेंगलुरूचे ४० हजार चौ.फुटाचे पेंटहाऊस, अविनाश भोसले ह्यांचे ५३ बेडरूम्सचे घर आणि अनेक थोरामोठ्या राजकारण्यांची फार्महौसेस ह्यांची यादी केलीत तर ही चळवळ कुठली ठिकाणे व्यापतील ते सहजी ध्यानात येईल.
आजकाल तंत्रज्ञान इतके सर्वत्र उपलब्ध आहे की ह्या सर्व्हेसाठी कोणाला काही खर्चही करायला नको. गुगल-अर्थवरून प्रचंड मोठी घरे कुठे आहेत आणि ती किती मोठी आहेत हे कोणी पोरसवदाही शोधून काढू शकेल. आता अशी घरेच जेव्हा हे चळवळ करणारे जाऊन धरणे धरून व्यापतील तेव्हाच कंपन्यांचे लोभ कमी होतील. ऑक्युपाय हा निरुपाय होणार आहे तो असा !

-----------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

----------------------------------------------------------------------

1 टिप्पणी:

  1. अर्थव्यवस्थेत कृत्रिम पद्धतीने आवश्यकता निर्माण केल्यावर हा प्रकार अपेक्षित होता.

    उत्तर द्याहटवा