--------------------------------------------------------------------------------------------------------
निर्भीड व्हा-----२६
सिंहासन विरुद्ध शवासन
श्री.कपिल सिबल म्हणाले ते अगदी खरे आहे की बाबा रामदेवांनी राजकीय आसन ( सिंहासन ) शिकविण्याच्या फंदात पडू नये. इतर आसने शिकवावीत वा करावीत. कदाचित ते अधिक स्पष्टपणे म्हणू शकले असते, की बाबांनी आता शवासन करावे !
काही काही घटनांमुळे आतले पदर अधिक स्पष्ट होत असतात. जसे रामदेवबाबांना मायावतींनी नोइडा येथे जाण्यासाठी परवानगी का नाकारली ? तर त्यांच्या काही केसेस सिबीआय कडे अजून शिल्लक आहेत व त्याचमुळे त्यांनी अणुकरारात नाही का कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला होता ? शिवाय बाबा भगवे, तर यूपीत मुसलमान ज्यास्त . मुसलमानांना जिथे योग करणेच अधार्मिक वाटते, व तसे फतवे ते वेळोवेळी काढतात, तिथे बाबा रामदेवांना कोण मुसलमान भजेल ?
शिवाय बाबा रामदेव कितीही म्हणाले तरीही ते शेवटी हिंदू साधूच पडतात. हिंदूंची मते कधीही एकगठ्ठा पडत नाहीत . कारण ती भाजप व इतर विरोधी पक्षात वाटल्या जातात. त्यामुळे ८०-८३ टक्के लोकसंख्या असूनही १३ टक्के मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांमुळे दिग्विजय सिंगांना सतत मुसलमानांची बाजू उचलावी लागते. मग इतके गणित सरळ असताना, सरकार सुरुवातीला तरी बाबा रामदेवांचे लांगुलचालन का करीत होते ? शबनम हाशमी ह्या मानवाधिकार कार्यकर्त्या बाईने ह्याचे गुपित थोडे परवा टीव्ही वरच्या वटवटीत उकलले आहे. त्या म्हणत होत्या की ह्यांचे हिंदू आतंकवादी पकडल्याबरोबर ह्यांनी हिंदुत्व सोडून भ्रष्टाचाराचा मुद्दा पेटवून दिला. आणि ते खरेच असावे. कारण कधी नव्हे ते भ्रष्टाचारापायी संसद अधिवेशन गोंधळात निकामी झाले. डिएमकेच्या मंत्र्यांवर कारवाई करावी लागली. लोकपाल बिलावर नमते घ्यावे लागले. हे जर इतके सरळ दिसतेय तर मग रामदेव बाबांवर प्रथमच नरमाई का दाखवली ? तर बाबा शिकवत होते राजकीय आसन "सिंहासन". बेत असा असावा : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर नाही म्हटले तरी प्रतिमा थोडी डागाळली हे तर खरेच. मग आता ती धुण्यासाठी काय करावे ? तर रामदेव बाबांनाच धोबीपछाड ? प्रथम त्यांना मोघम पण चांगल्या वाटतील अशा मागण्या* मागायला सांगायचे मग तुमच्या ९९ टक्के मागण्या मंजूर म्हणायचे व मग द्यायचा धोबीपछाड. धोका काय ? तर हिंदू मते जातील , हाच ना ? ती तर केव्हाच आपली नव्हती, तेव्हा त्याचे काय एवढे ? फार तर मनमोहन व सिबल ह्यांच्या प्रतिमा डागाळतील ! डागाळू दे ! नाही तरी राहूलला पंतप्रधान करायचे तर केव्हा ना केव्हा ह्यांना दूर सारावेच लागेल ! लोकांचे काय दोन तीन दिवसात बाबाला शवासन करताना बघून कंटाळतीलच ! तर हे असावे रामलीलावर घडलेल्या "इटा-लीला" चे मानस-शास्त्र !
* बाबांच्या भ्रष्टाचारावरच्या, चांगल्या वाटतील अशा मागण्यावरून, एक किस्सा आठवला. मागणी होती की परदेशातले काळे धन ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी. त्याच्यात काय, करू की ! ती केली तरी, आपल्या स्विस ऍकाऊंटला धोका पोचत नाही. कसा ? असा : एक राजपुत्र असतो. त्याला स्विस बॅंकेत खाते उघडायचे असते. तो स्विस बॅंकेत जातो. सोपस्कार करून खाजगीत मॅनेजरच्या खोलीत जातो. त्याला म्हणतो, आधीच्या पंतप्रधानांनी आमचा देश लुटून तुमच्या स्विस बॅंकेत "काला धन" ठेवले आहे. त्याचा ऍकाऊंट नंबर सांगा. मॅनेजर म्हणतो मी तसे करू शकत नाही. राजपुत्र लगेच जवळचे पिस्तूल काढून मॅनेजरच्या माथ्यावर रोखतो. म्हणतो, सांगता की नाही, नाही तर झाडतोच गोळी, आता ! मॅनेजर बधत नाही. म्हणतो, नंबर, मेलो तरी सांगू शकत नाही. मग जवळची बॅग सरकवत राजपुत्र म्हणतो, आता खात्री झाली ! मला ऍकाऊंट उघडायचेय, हे घ्या माझे पैसे, जमा करा !
शेवटी "सिंहासन" ते सिंहासन , व शवासन ते शवासन ! आपण विराजमान व्हावे ते सिंहासनावर व इतरांनी करावे शवासन !
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------